१३
पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत 
 १ त्यादिवशी येशू घरातून निघून सरोवराच्या किनार्याशी जाऊन बसला  २ तेव्हा लोकांचे समुदाय त्याच्याजवळ जमले; म्हणून तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनार्यावर उभे राहिले.  ३ मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या तो म्हणाला पाहा, पेरणारा पेरणी करावयास निघाला;  ४ आणि तो पेरणी करीत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले.  ५ काही खडकाळ जमिनीवर पडले, तेथे फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले;  ६ आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्यास मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले.  ७ काही काटेरी झाडांमध्ये पडले; मग काटेरी झाडानी वाढून त्याची वाढ खुंटवली.  ८ काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, असे पीक आले  ९ ज्याला कान आहेत तो ऐको. 
दृष्टांतांचा उपयोग 
 १० मग शिष्य जवळ येऊन त्यास म्हणाले, आपण त्याच्याबरोबर दाखल्यानी का बोलता?  ११ त्याने त्यास उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची गुपीते जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.  १२ कारण ज्या कोणाजवळ आहे त्यास दिले जाईल व त्यास भरपूर होईल; ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.  १३ यास्तव मी त्याच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो; कारण ते पाहत असता पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही.  १४ यशयाचा संदेश त्याच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की, 
तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हास समजणारच नाही, 
व पाहाल तर खरे, परंतु तुम्हास दिसणारच नाही; 
 १५ कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, 
ते कानानी मंद ऐकतात आणि त्यांनी डोळे मिटून घेतले आहेत; 
यासाठी की, त्यानी डोळ्यांनी पाहू नये, 
कानांनी ऐकू नये, 
अंतःकरणाने समजून नये 
आणि पुन्हा मागे फिरू नये 
आणि मी त्यांना बरे करू नये. 
 १६ पण तुमचे डोळे धन्य आहेत, कारण ते पाहत आहे; आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत.  १७ मी तुम्हास खरे सांगतो की, तुम्ही जे पाहत आहात ते पाहावयास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही; आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकावयास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही. 
पेरणाऱ्याच्या दृष्टांताचे स्पष्टीकरण 
 १८ आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या.  १९ वाटेवर पेरलेला तो हा आहे की, कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्यास समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो;  २० खडकावरील पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो व ते लगेच आनंदाने स्वीकारतो;  २१ परंतु त्यास मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो.  २२ काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो.  २३ चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो; तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो. 
निदणाचा दृष्टांत 
 २४ त्याने त्याच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला. कोणी एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे.  २५ लोक झोपेत असताना त्याचा शत्रू येऊन गव्हामध्ये निदण पेरून निघून गेला;  २६ पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निदण ही दिसले.  २७ तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्यास म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यामध्ये निदण कोठून आले?  २८ तो त्यांना म्हणाला हे काम कोणा शत्रूचे आहे. दासांनी त्यास म्हटले, तर आम्ही जाऊन ते काढून टाकावे अशी आपली इच्छा आहे काय?  २९ तो म्हणाला, नाही. तुम्ही निदण गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहू ही उपटाल.  ३० कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या; मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की, पहिल्याने निदण गोळा करा आणि जाळण्यासाठी त्याच्या पेढ्या बांधा; परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. 
मोहरीचा दाणा व खमीर यांचे दृष्टांत 
 ३१ त्याने त्याच्यापुढे आणखी एक दाखला मांडला की, स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे; तो कोणाएका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला;  ३२ तो तर सर्व दाण्यामध्ये लहान आहे; तरी वाढल्यावर भाजीपाल्यापेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की, आकाशातील पाखर त्याच्या फांद्यात वस्ती करतात. 
 ३३ त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की, स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे; ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पीठामध्ये लपवून ठेवले, तेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले. 
 ३४ या सर्व गोष्टी येशूने दाखल्यानी लोकसमुदायाला सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्याच्याबरोबर काही बोलला नाही;  ३५ यासाठी की, संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, 
दाखले सांगायला मी आपले तोंड उघडीन; 
जगाच्या स्थापनेपासून गुप्त राहिलेल्या गोष्टी मी बोलून दाखवीन. 
निदणाच्या दृष्टांताचे स्पष्टीकरण 
 ३६ नंतर तो लोकसमुदायास निरोप देऊन घरात गेला; तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निदणाच्या दाखल्याची आम्हास फोड करून सांगा.  ३७ त्याने उत्तर दिले की, चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे.  ३८ शेत हे जग आहे; चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत;  ३९ ते पेरणारा शत्रू हा सैतान आहे; कापणीही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत;  ४० तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल.  ४१ मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतांना पाठवील आणि त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व वस्तू व अन्याय करणार्यांना जमा करील,  ४२ आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.  ४३ तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत तो ऐको. 
ठेव, मोती व जाळे यांचे दृष्टांत 
 ४४ स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या धनासारखे आहे, ती कोणाएका मनुष्यास सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात त्याने जाऊन, आपले सर्वस्व विकले आणि ते शेत विकत घेतले. 
 ४५ आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणाएका व्यापारासारखे आहे;  ४६ त्यास एक अति मोलवान् मोती आढळला; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतला. 
 ४७ आणखी, स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्वप्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे;  ४८ ते भरलेल्या मनुष्यानी ते किनार्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले.  ४९ तसे युगाच्या समाप्तीस होईल; देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील.  ५० आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल. 
 ५१ तुम्हास या सर्व गोष्टी समजल्या काय? ते त्यास म्हणाले, हो.  ५२ तेव्हा तो त्यांना म्हणाला, प्रत्येक नियमशास्त्राचा शिक्षक जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्या जुन्या गोष्टी काढणार्या मनुष्यासारखा आहे. 
नासरेथात येशूचा अव्हेर 
 ५३ नंतर असे झाले की, हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तेथून निघाला.  ५४ आणि स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्याच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान व अद्भूत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य या मनुष्यास कोठून मिळते?  ५५ हा सुताराचा पुत्र ना? याच्या आईला मरीया म्हणतात ना? याकोब, योसे, शिमोन व यहूदा, हे याचे भाऊ ना?  ५६ याच्या बहिणी, त्या सर्व आपणाबरोबर नाहीत काय? मग ते सर्व याला कोठून?  ५७ असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यास म्हटले, संदेष्ट्याला आपला देश व आपले घर यामध्ये मात्र सन्मान मिळत नाही.  ५८ तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भूत कृत्ये केली नाहीत.