६
 १ परमेश्वरा, रागाने मला सुधारु नकोस. रागावू नकोस आणि मला शिक्षा करु नकोस.  २ परमेश्वरा माझ्यावर दया कर. मी आजारी आहे आणि अशक्त झालो आहे. मला बरे कर, माझी हाडे खिळखिळी झाली आहेत.  ३ माझे सर्व शरीर थरथरत आहे. परमेश्वरा मला बरे करण्यासाठी तुला आणखी किती वेळ लागणार आहे?  ४ परमेश्वरा, तू परत ये व मला पुन्हा शक्ती दे. तू दयाळू आहेस म्हणून मला वाचव.  ५ मेलेली माणसे थडग्यात तुझी आठवण काढू शकत नाहीत. मृत्युलोकातले लोक तुझे गुणवर्णन करु शकत नाहीत. म्हणून तू मला बरे कर.  ६ परमेश्वरा, सबंध रात्र मी तुझी प्रार्थना केली. माझ्या अश्रुंमुळे माझे अंथरुण ओले झाले आहे. माझ्या अंथरुणातून अश्रू ठिबकत आहेत. तुझ्याजवळ अश्रू ढाळल्यामुळे मी आता शाक्तिहीन, दुबळा झालो आहे.  ७ माझ्या शंत्रूंनी मला खूप त्रास दिला. त्यांचे मला खूप वाईट वाटत आहे. आता माझे डोळे रडून रडून क्षीण झाले आहेत.  ८ वाईट लोकांनो, तुम्ही इथून निघून जा. का? कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे.  ९ परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली. त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्याने मला उत्तर दिले.  १० माझे सर्व शत्रू व्यथित आणि निराश होतील. एकाएकी काहीतरी घडेल आणि ते लज्जित होऊन निघून जातील.