६१
 १ देवा, माझे प्रार्थना गीत ऐक. माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.  २ मी कुठेही असलो कितीही अशक्त असलो तरी मी तुला मदतीसाठी हाक मारीन. तू मला अगदी उंचावरच्या सुरक्षित जागी घेऊन जा.  ३ तूच माझी सुरक्षित जागा आहेस. माझ्या शत्रूपासून माझे रक्षण करणारा तू बळकट किल्ला आहेस.  ४ तुझ्या तंबूत मला कायमचे राहायला पाहिजे, जेथे तू माझे रक्षण करु शकशील अशा ठिकाणी मला लपण्याची इच्छा आहे.  ५ देवा, मी तुला काही देण्याचे वचन दिले होते ते तू ऐकले होतेस परंतु तुझ्या उपासकांजवळ जे काही आहे ते तुझेच आहे.  ६ राजाला भरपूर आयुष्य दे त्याला कायमचे राहू दे.  ७ त्याला देवाजवळ चिरकाल राहू दे. तुझ्या खऱ्या प्रेमाने तू त्याचे रक्षण कर.  ८ आणि मी तुझ्या नावाचा सदैव जयजयकार करीन. ज्या गोष्टी करण्याचे मी वचन दिले त्या मी रोज करीन.