नीतिसूत्रे 
लेखक 
राजा शलमोन हा नीतिसूत्रे पुस्तकाचा मुख्य लेखक आहे. शलमोनाचे नाव 1:1, 10:1, आणि 25:1 मध्ये नमूद आहे. इतर योगदानकर्त्यामध्ये “बुद्धिमान,” आगूर, आणि राजा लमुएल नावाच्या पुरुषांचा समूह यांचा समावेश आहे. पवित्र शास्त्राच्या इतर गोष्टींप्रमाणेच, नीतिसूत्रे देवाच्या तारणाची योजना दर्शवितात परंतु कदाचित अधिक स्पष्टपणे. या पुस्तकात इस्त्राएली लोकांना जगण्याचा योग्य मार्ग, देवाचा मार्ग दाखवून दिला. हे शक्य आहे की देवाने शलमोनाला त्याच्या संपूर्ण आयुष्यात प्रकट होणारा हा भाग ज्ञानी शब्दांच्या आधारे नोंद करण्यास प्रेरित केले. 
तारीख आणि लिखित स्थान 
साधारण इ. पू. 971 - 686. 
शलमोन राजाच्या राजवटीत हजारो वर्षांपूर्वीच नीतिसूत्रे इस्राएलमध्ये लिहिले होते, त्याचा शहाणपणा कोणत्याही वेळी कोणत्याही संस्कृतीला लागू आहे. 
प्राप्तकर्ता 
नीतिसूत्रामध्ये बरेच दर्शक आहेत. पालकांना आपल्या मुलांकरता सूचना दिल्या जातात. पुस्तक शहाणपणा शोधत असलेले तरुण पुरुष आणि स्त्रियांनाही लागू होते आणि शेवटी ते आजच्या पवित्र शास्त्र वाचकांसाठी व्यावहारिक सल्ला पुरवते ज्यांना धार्मिक जीवन जगण्याची इच्छा आहे. 
हेतू 
नीतिसूत्रे पुस्तकात, शलमोनाने उच्च आणि उदात्त आणि सर्वसामान्य, सामान्य, दररोजच्या परिस्थितीतही देवाने दिलेले विचार प्रकट केले आहेत. असे दिसून येते की राजा शलमोन याच्या नजरेतून कोणताही विषय सुटला नाही. निष्ठावंत वचनांच्या या समृद्ध संकलनात समाविष्ट असलेल्या अनेक विषयांमध्ये वैयक्तिक वागणूक, लैंगिक संबंध, व्यवसाय, संपत्ती, उदारपणा, महत्वाकांक्षा, शिस्त, कर्ज, मुलांचे संगोपन, वर्ण, मद्य, राजकारण, सूड आणि देवभक्ती या बाबी आहेत. 
विषय 
शहाणपण 
रूपरेषा 
1. शहाणपणाचे गुण — 1:1-9:18 
2. शलमोनाची नीतिसूत्रे — 10:1-22:16 
3. शहाण्याचे वचन — 22:17-29:27 
4. आगूराचे शब्द — 30:1-33 
5. लमुएलचे शब्द — 31:1-31  
 1
नीतिसूत्रांचे मोल 
 1 इस्राएलाचा राजा, दावीदाचा पुत्र शलमोन, याची ही नितीसूत्रे. 
 2 ज्ञान व शिक्षण शिकावे, 
बुद्धीच्या वचनाचे ज्ञान मिळवावे, 
 3 सुज्ञतेचे शिक्षण घेऊन जे योग्य, न्यायी, आणि चांगले ते करण्यास शिकावे, 
 4 भोळ्यांना शहाणपण 
आणि तरुणांना ज्ञान व दूरदर्शीपणा द्यावे, 
 5 ज्ञानी व्यक्तीने ऐकावे आणि त्याने ज्ञानात वाढावे, 
बुद्धीमान व्यक्तीला मार्गदर्शन मिळावे, 
 6 ज्ञानी लोकांची वचने आणि त्याची गूढरहस्ये समजावी, 
म्हणून म्हणी व सुवचने ह्यासाठी ही आहेत. 
 7 परमेश्वराचे भय ज्ञानाची सुरुवात आहे, 
मूर्ख ज्ञान आणि शिक्षण तुच्छ मानतात. 
आदेश आणि ताकीद 
 8 माझ्या मुला, तू तुझ्या वडिलांची शिकवण ऐक, 
आणि तू तुझ्या आईचा नियम बाजूला टाकू नकोस; 
 9 ते तुझ्या शिराला सुशोभित वेष्टन 
आणि तुझ्या गळ्यात लटकते पदक आहे. 
 10 माझ्या मुला, जर पापी तुला फूस लावून त्यांच्या पापात पाडण्याचा प्रयत्न करतो, 
तर त्याच्यामागे जाण्यास नकार दे; 
 11 जर ते म्हणतील “आमच्याबरोबर ये. आपण वध करण्यास वाट बघू; 
आपण लपू व निष्कारण निष्पाप व्यक्तीवर हल्ला करू. 
 12 जसे अधोलोक निरोग्यांना गिळून 
गर्तेत पडणाऱ्यांसारखे करतो तसे आपण त्यांना जिवंतपणीच गिळून टाकू. 
 13 आपणांस सर्व प्रकारच्या मौलवान वस्तू मिळतील; 
आपण इतरांकडून जे चोरून त्याने आपण आपली घरे भरू. 
 14 तू आपला वाटा आम्हाबरोबर टाक, 
आपण सर्व मिळून एकच पिशवी घेऊ.” 
 15 माझ्या मुला, त्यांच्याबरोबर त्या मार्गाने खाली जाऊ नकोस; 
ते जेथून चालतात त्याचा स्पर्शही तुझ्या पावलांना होऊ देऊ नकोस; 
 16 त्यांचे पाय दुष्कृत्ये करायला धावतात, 
आणि ते रक्त पाडायला घाई करतात. 
 17 एखादा पक्षी पाहत असतांना, 
त्यास फसवण्यासाठी जाळे पसरणे व्यर्थ आहे. 
 18 ही माणसे तर आपल्या स्वतःचा घात करण्यासाठी टपतात. 
ते आपल्या स्वतःसाठी सापळा रचतात. 
 19 जो अन्यायाने संपत्ती मिळवतो त्या प्रत्येकाचे मार्ग असेच आहेत; 
अन्यायी धन ज्यांनी धरून ठेवले आहे ते त्यांचाही जीव घेते. 
ज्ञानाची विनंती 
 20 ज्ञान रस्त्यावर पुकारा करते, 
ते उघड्या जागेवर आपली वाणी उच्चारते; 
 21 ती गजबजलेल्या रस्त्याच्या नाक्यावरून घोषणा करते, 
शहराच्या प्रवेशद्वारापाशी घोषणा करते, 
 22 “अहो भोळ्यांनो, जे काही तुम्हास समजत नाही त्याची किती वेळ आवड धरणार? 
तुम्ही चेष्टा करणारे, किती वेळ चेष्टा करण्यात आनंद पावणार, 
आणि मूर्ख किती वेळ ज्ञानाचा तिरस्कार करणार? 
 23 तुम्ही माझ्या निषेधाकडे लक्ष द्या; 
मी आपले विचार तुम्हावर ओतीन; 
मी आपली वचने तुम्हास कळवीन. 
 24 मी बोलावले पण तुम्ही ऐकायला नकार दिला; 
मी आपला हात पुढे केला, पण कोणीही लक्ष दिले नाही. 
 25 परंतु तुम्ही माझ्या सर्व शिक्षणाचा अव्हेर केला 
आणि माझ्या दोषारोपाकडे दुर्लक्ष केले. 
 26 म्हणून मीही तुमच्या संकटाना हसेन, 
तुमच्यावर संकटे आलेली पाहून मी थट्टा करीन. 
 27 जेव्हा वादळांप्रमाणे तुमच्यावर भितीदायक दहशत येईल, 
आणि तुफानाप्रमाणे तुमच्यावर समस्या आघात करतील; 
जेव्हा संकटे आणि दु:ख तुम्हावर येतील. 
 28 ते मला हाका मारतील आणि मी त्यांना उत्तर देणार नाही; 
ते माझा झटून शोध करतील, पण मी त्यांना सापडणार नाही. 
 29 कारण त्यांनी ज्ञानाचा द्वेष केला; 
आणि परमेश्वराचे भय निवडून घेतले नाही, 
 30 त्यांनी माझ्या शिक्षणास नकार दिला, 
आणि त्यांनी माझी तोंडची शिक्षा अवमानली. 
 31 म्हणून ते आपल्या वर्तणुकीचे फळ खातील 
आणि आपल्याच योजनांच्या फळाने भरले जातील. 
 32 कारण जो कोणी भोळा जेव्हा दूर निघून जाईल त्याचा नाश होईल; 
आणि मूर्खाचे स्वस्थपण त्याचा नाश करील. 
 33 परंतु जो कोणी माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो. 
आणि अरिष्टाची भिती नसल्यामुळे स्वस्थ राहतो.”