1 Timothy
पौलाचे तीमथ्याला पहिले पत्र
नमस्कार व खोटया शिक्षणासंबंधाने इशारा
१ देव आपला तारणारा आणि ख्रिस्त येशू आपली आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याजकडून: २ विश्वासातील माझे खरे मूल तीमथ्य यास आपला देव जो पिता आणि आपला ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्याकडून कृपा, दया आणि शांती असो.
३ मासेदोनियास जातांना जशी मी तुला कळकळीने विनंती केली होती तशी आताही करतो की, तू इफिसात रहावे, जेणेकरून तू कित्येकास निक्षून सांगावे की, त्यांनी अन्य शिकवण शिकवू नये. ४ आणि जी दैवी व्यवस्था विश्वासाच्याद्वारे आहे तिच्या उपयोगी न पडणाऱ्या पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कहाण्यांकडे व अनंत वंशावळ्यांकडे लक्ष देऊ नका. तेच मी आतांही सांगतो. ५ आणि या आज्ञेचे उद्दिष्ट प्रीती आहे, जी शुद्ध अंतःकरणातून, चांगल्या विवेकभावातून व निष्कपट विश्वासातील असावी. ६ या गोष्टी सोडून कित्येकजण व्यर्थ बोलण्याकडे वळले आहेत. ७ त्यांना नियमशास्त्राचे शिक्षक व्हायचे होते पण ते ज्या गोष्टीविषयी मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात व सांगतात त्या त्यांनाच कळत नाहीत.
८ परंतु आम्हास हे माहीत आहे की, कोणी नियमशास्त्राचा खरोखरच यथार्थ उपयोग केल्यास ते चांगले आहे. ९ आणि आपल्याला हे ठाऊकच आहे की, नियमशास्त्र हे नीतिमान लोकांसाठी केलेले नाही तर आज्ञाभंग करणाऱ्या आणि विद्रोही, पापी, भक्तिहीन, अधर्मी, अशुद्ध, वडिलांना ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्यघातक १० जारकर्मी, समलैंगीक, मनुष्यांचा व्यापार करणारे, खोटारडे, खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी आहे आणि शुद्ध शिकवणीविरुद्ध जर काही दुसरे असेल तर त्यासाठीही आहे. ११ गौरवी सुवार्ता जी धन्यवादित देवाकडून येते आणि जी माझ्यावर सोपवली आहे, तिला हे अनुसरून आहे.
ख्रिस्तकृपेबद्दल पौलाने दाखवलेली कृतज्ञता
१२ ज्याने मला शक्ती दिली त्या ख्रिस्त येशू आपल्या प्रभूचे मी उपकार मानतो कारण त्याने मला विश्वासू मानून सेवेत ठेवले आहे. १३ जरी मी पूर्वी देवनिंदा करणारा, छळणारा आणि हिंसक होतो पण मी ते अजाणता व अविश्वासाने केले म्हणून माझ्यावर दया झाली. १४ परंतु विश्वास आणि प्रीती जी ख्रिस्त येशूमध्ये सापडते ती आपल्या प्रभूच्या कृपेने ओसंडून वाहिली. १५ ही गोष्ट विश्वसनीय व पूर्ण अंगीकार करण्यास योग्य आहे की, ख्रिस्त येशू पापी लोकांस तारावयला जगात आला आणि त्या पापी लोकांपैकी मी मुख्य पापी आहे. १६ परंतु केवळ याच हेतूने माझ्यावर दया दाखविण्यात आली की माझ्यासारख्या अत्यंत वाईट पाप्यावर ख्रिस्त येशूने सहनशीलता दाखवली त्या उदाहरणावरून, पुढील काळात जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना सर्वकाळचे जीवन मिळावे.
१७ आता सर्वकाळचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला सन्मान आणि गौरव सदासर्वकाळासाठी असो. आमेन.
१८ तीमथ्या, माझ्या मुला, मी तुला तुझ्याविषयी पूर्वीच सांगण्यात आलेल्या संदेशानुसार ही आज्ञा सोपवत आहे. यासाठी की तू त्यांच्याद्वारे चांगली लढाई करावी. १९ आणि विश्वास व चांगला विवेकभाव धर. कित्येकांनी हा झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरुपी तारू फुटले. २० त्यामध्ये हूमनाय आणि आलेक्सांद्र आहेत त्यांना मी सैतानाच्या स्वाधीन केले आहे यासाठी की, निंदा न करण्यास शिकावे.