प्रभूचे आगमन व जागृतीची आवश्यकता
१ बंधूनो, काळ व समय ह्यांविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही. २ कारण तुम्हा स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो. ३ “शांती आहे, सुरक्षितता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अचानक वेदना सुरु होतात त्याप्रमाणे त्यांचा अचानक नाश होईल आणि ते निभावणारच नाहीत. ४ बंधुनो, त्या दिवसाने चोरासारखा तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही. ५ कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात; आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. ६ ह्यावरून आपण इतरांप्रमाणे झोप घेवू नये, तर जागे व सावध रहावे. ७ झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात. ८ परत जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे; विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्राण घालावे. ९ कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. १० प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी याकरिता मरण पावला की, आपण जरी मागे राहिलो किंवा मरण पावलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत रहावे.
११ म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उभारणी करा; हे तुम्ही करतही आहात.
निरनिराळे सद्बोध व पत्राची समाप्ती
१२ आणि बंधूंनो, आम्ही तुम्हास विनंती करतो की, जे तुमच्यांत परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमच्यांवर आहेत आणि तुम्हास बोध करतात त्यांच्याकडे लक्ष द्या; १३ आणि त्यांना त्यांच्या कामावरून प्रीतीने फार थोर माना आणि एकमेकांशी शांतीने रहा.
१४ आता बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करतो की, जे अव्यवस्थीत आहेत त्यांना तुम्ही इशारा द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या, अशक्त आहेत त्यांना आधार द्या; सर्वांबरोबर सहनशील असा. १५ आणि तुम्ही हे पाहा की, कोणी कोणाला वाईटाबद्दल वाईट असे भरून देऊ नये; पण तुमच्यात एकमेकांसाठी व सर्वसाठी जे चांगले आहे त्याच्या सतत मागे लागा.
१६ सदोदित आनंद करा. १७ नित्य प्रार्थना करा. १८ प्रत्येक गोष्टींत उपकार माना कारण तुमच्यासंबधी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. १९ पवित्र आत्म्याला विझवू नका. २० संदेशाचा उपहास करू नका. २१ सर्व गोष्टींची पारख करा. जे चांगले आहे ते मजबूत धरा. २२ वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर रहा.
२३ आणि स्वतः शांतीचा देव तुम्हास पूर्ण पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे येणे होईल तेव्हा तुमचा आत्मा, जीव आणि शरीर पूर्ण निर्दोष राहो. २४ तुम्हास जो बोलवत आहे तो विश्वासू आहे; तो हे करीलच.
२५ बंधूंनो, आमच्यासाठी प्रार्थना करा.
२६ सर्व बंधूंना पवित्र प्रीतीने नमस्कार सांगा.
२७ मी तुम्हास प्रभूची आज्ञा म्हणून सांगतो की, हे पत्र सर्व बंधूंना वाचून दाखवा.
२८ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.