प्रांजळपणे व धैर्याने सुवार्ता गाजवणे
१ म्हणून, आमच्यावर देवाची दया झाल्यामुळे ही सेवा आम्हास देण्यात आली आहे, म्हणून आम्ही खचत नाही. २ आम्ही लज्जास्पद गुप्त गोष्टी आम्ही सोडल्यात; आम्ही कपटाने वागत नाही किंवा आम्ही देवाचे वचन फसवेपणाने हाताळीत नाही तर देवाच्या दृष्टीसमोर खरेपण प्रकट करण्यास आम्ही आपणांसमोर सर्व लोकांच्या सद्सदविवेकबुद्धीला पटवितो. ३ पण आमची सुवार्ता आच्छादली गेली असेल तर ज्यांचा नाश होत आहे त्यांच्यासाठी ती आच्छादली गेली आहे. ४ जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने या युगाच्या दुष्ट दैवताने आंधळी केलीली आहेत. ५ कारण आम्ही स्वतःची घोषणा करीत नाही पण ख्रिस्त येशू जो प्रभू आहे त्याची आम्ही घोषणा करतो आणि येशूकरता आम्ही तुमचे दास आहोत. ६ कारण ज्या देवाने प्रकाशाला अंधारामधून प्रकाशण्यास सांगितले तो आमच्या अंतःकरणात, येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी प्रकाशला आहे.
प्रेषितांची शक्तिहीनता व देवाचे सामर्थ्य
७ पण आमचे हे धन आमच्याजवळ मातीच्या भांड्यात आहे, याचा अर्थ हा की, सामर्थ्याची पराकाष्ठा आमची नाही पण देवाची आहे. ८ आम्हावर चारी दिशांनी संकटे येतात पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही, आम्ही गोधळलेलो आहोत पण निराश झालो नाही. ९ आमचा पाठलाग केला गेला, पण त्याग केला गेला नाही, आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही. १० आम्ही निरंतर आमच्या शरीरात येशूचे मरण घेऊन जात असतो; यासाठी की, आमच्या शरीरात येशूचे जीवनही प्रकट व्हावे. ११ कारण आम्ही जे जिवंत आहोत ते येशूकरता मरणाच्या सतत स्वाधीन केले जात आहोत; म्हणजे आमच्या मरणाधीन देहात येशूचे जीवनही प्रकट व्हावे. १२ म्हणून, आमच्यात मरण, पण तुमच्यात जीवन हे कार्य करते.
१३ मी विश्वास ठेवला आणि म्हणून मी बोललो, हे पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे आम्ही विश्वास ठेवला आहे आणि म्हणून बोलतो; कारण आमच्यात तोच विश्वासाचा आत्मा आहे. १४ कारण आम्ही हे जाणतो की, प्रभू येशूला ज्याने उठवले तो आपल्यालाही येशूबरोबर उठवील आणि आम्हास तुमच्याबरोबरच सादर करील. १५ सर्व गोष्टी तुमच्याकरता आहेत, म्हणजे ही विपुल कृपा पुष्कळ जणांच्या उपकारस्मरणाने, देवाच्या गौरवार्थ बहुगुणित व्हावी.
क्षणिक दुःख पण सार्वकालिक वैभव
१६ म्हणून आम्ही खचत नाही. पण जरी आमचे हे बाहेरील देहपण नाश पावत आहे, तरी आमचे अंतर्याम हे दिवसानुदिवस नवीन होत आहे. १७ कारण हे जे हलके दुःख केवळ तात्कालिक आहे ते आमच्यासाठी फार अधिक मोठ्या अशा सार्वकालिक गौरवाचा भार तयार करते. १८ आता आम्ही दिसणार्‍या गोष्टींकडे पाहत नाही पण न दिसणार्‍या गोष्टींकडे पाहतो कारण दिसणार्‍या गोष्टी क्षणिक आहेत पण न दिसणार्‍या गोष्टी सार्वकालिक आहेत.