१ म्हणून आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबीसंबंधी बोलत राहण्याचे सोडून देऊ व प्रौढतेप्रत जाऊ. पुन्हा एकदा देवावरचा विश्वास, निर्जीव गतजीवनाचा पश्चात्ताप, २ बाप्तिस्म्यांचे, डोक्यावर हात ठेवण्याचे, मृतांचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक न्यायनिवाडा शिकवण, या मूलभूत गोष्टींचा पाया आपण पुन्हा घालू नये. ३ देव होऊ देईल तर हे आपण करू.
४ कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानांचा अनुभव घेतला आहे व जे पवित्र आत्म्याचे भागीदार झाले आहेत, ५ आणि ज्यांनी देवाच्या वचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची अनुभवली आहे, ६ त्यानंतर ख्रिस्तापासून जर ते दूर गेले तर त्यांना पश्चात्तापाकडे वळवणे अशक्य आहे, कारण त्यांच्या स्वतःच्या हानिकरता ते देवाच्या पुत्राला पुन्हा वधस्तंभावर खिळतात व लोकांच्या अवकृपेच्या समोर त्यास आणतात. ७ कारण जी जमीन वेळोवेळी पडणाऱ्या पावसाचे पाणी पिते व ज्या लोकांकडून तिची लागवड होते त्यांच्यासाठी धान्य उपजविते तिला देवाकडून आशीर्वाद प्राप्त होतो. ८ पण जी जमीन काटे व कुसळे उपजविते, ती निरुपयोगी आहे व तिला शाप मिळण्याची भिती असते; तिचा अग्नीने नाश होईल.
९ प्रियजनहो, आम्ही या गोष्टी तुम्हास सांगत आहोत, पण खरोखर आम्ही तुमच्याकडून अधिक चांगल्याची अपेक्षा करतो. आम्हास अशी खात्री आहे की, ज्या तारणाचा भाग असलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कराल. १० कारण तुम्ही केलेली पवित्र जनांची सेवा, त्या सेवेत तुम्ही अजूनही दाखवीत असलेले सातत्य, तुमचे काम व त्याच्या लोकांस दानाद्वारे व इतर मदत करण्याद्वारे तुम्ही त्याच्या नावावर केलेली प्रीती ही सर्व विसरण्याइतका देव अन्यायी नाही. ११ पण आमची अशी इच्छा आहे की, तुमच्या आशेच्या पूर्तीची पूर्ण खात्री होण्याकरता तुमच्यातील प्रत्येकाने शेवटपर्यंत कार्याची अशीच आवड दाखवावी. १२ आम्हास असे वाटते की, तुम्ही आळशी बनू नये. तर जे लोक विश्वासाद्वारे व धीराद्वारे देवाने दिलेल्या अभिवचनाचा वारसा मिळवतात अशा लोकांचे अनुकरण करणारे तुम्ही व्हावे.
देवाच्या वचनांनी आशेस स्फुर्ती येते
१३ जेव्हा देवाने अब्राहामाला वचन दिले, तेव्हा त्याच्यापेक्षा कोणी मोठा नसल्याने देवाने स्वतःच्याच नावाने शपथ वाहिली. १४ तो म्हणाला, “मी तुला भरपूर आशीर्वाद देईनच आणि मी तुझ्या वंशजांना महान रीतीने बहुगुणित करीनच करीन.” १५ म्हणून धीराने वाट पाहिल्यानंतर देवाने जे वचन त्यास दिले होते ते त्यास प्राप्त झाले. १६ लोक, नेहमी शपथ वाहताना आपल्यापेक्षा जो मोठा असतो त्याच्या नावाचा उपयोग करतात कारण शपथ ही विदित केलेल्या सत्याची खात्री पटवणे व सर्व वादाचा शेवट करणे यासाठी असते. १७ आपल्या योजनेचे कधीही न बदलणारे स्वरूप वचनाच्या वारसदारांना कळावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणून त्याने वाहिलेल्या शपथेच्या द्वारे याबाबत हमी दिली. १८ देवाने असे केले यासाठी की, ज्यांच्याविषयी लबाडी करणे देवासाठी अशक्य आहे अशा दोन न बदलणाऱ्या कृतींमुळे जे आपण आश्रयाकरता निघालो आहोत, त्या आपणास त्या आशेसंबधाने अधिक उत्तेजन प्राप्त व्हावे. १९ आम्हासही आशा जणू काय भक्कम, सुरक्षित अशा नांगरासारखी आत्म्याला आहे व ही आशा परमेश्वराच्या भवनाच्या पडद्यामागील आतील बाजूस प्रवेश करते, २० तेथे आमच्यापुढे धावत येशू आमच्यासाठी आत गेलेला आहे. तो मलकीसदेकाप्रमाणे युगानुयुगासाठी महायाजक झाला आहे.