इस्त्राएल लोकांची परीक्षा पाहण्यासाठीं राखून ठेवलेलीं राष्टें १ इस्त्राएलांपैकी ज्यांना कनान देशांतील लढा यांचा अनुभव नव्हता त्यांना कसास लावण्यासाठी २ आणि इस्त्राएल लोकांच्या पिंढ्यां पैकी ज्यांना युध्दाचा पूर्वींचा मुळींच अनुभव नव्हता त्यांना तिचा अनुभव तरी घडावा व युध्दकलेंचें शिक्षण मिळावें म्हणून परमेश्वरानें जी राष्टें राहूं दिली तीं ही; ३ पलिष्ट्यांचे पांच सरदार आणि सर्व कनानी, सीदोनी आणि बआल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या खिंडीपर्यंत लबानोन पर्वतांत राहणारे हिव्वी. ४ परमेश्वरानें मोशेच्या व्दारें इस्त्राएलांच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञा ते पाळतात कीं नाहीं ह्याची परीक्षा त्यांच्याकरवीं घेण्याकरितां परमेश्वरानें त्यांना मागें ठेवलें होतें. ५ अशा प्रकारें इस्त्राएल लोक कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्यामध्यें राहूं लागले. ६ ते त्यांच्या मुलींशीं विवाह करूं लागले, आपल्या मुली त्यांच्या मुलांना देऊ लागले आणि त्यांच्या देवांची सेवा करूं लागले. कुशन-रिशाथईमच्या हातांतून अथनिएल इस्त्राएल लोकांस सोडवतो ७ इस्त्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीनें वाईट तें केलें, आपला देव परमेश्वर ह्याला ते विसरले आणि बथाल व अशेरा ह्या मूर्तीची सेवा करूं लागले; ८ म्हणून इस्त्राएलांवर परमेश्वराचा कोप भडकला आणि त्यानें त्यांना अराम-नहराईमचा राजा कुशन-रिशाथईम ह्याच्या हातीं दिलें, आणि इस्त्राएल लोकांनी आठ वर्षेपर्यंत कुशन-रिशाथईम ह्याचें दास्य केलें. ९ इस्त्राएल लोकांनीं परमेश्वराचा धांवा केला तेव्हां त्यानें त्यांच्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याला सोडविणारा म्हणून उभें केलें आणि त्यानें त्यांची सुटका केली. १० त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व तो इस्त्राएलाचा शास्ता झाला; तो लढाईला निघाला तेव्हां परमेश्वरानें अरामाचा राजा कुशन-रिशाथईम ह्याला त्याच्या हातीं दिलें व त्याच्यावर त्याचें वर्चस्व झालें, ११ त्यानंतर चाळीस वर्षे देशाला स्वास्थ लाभलें. मग कनाजाचा मुलगा अथनिएल मृत्यू पावला. मवाबाच्या हातून एहूद इस्त्राएल लोकांस सोडवितो १२ पुन्हा इस्त्राएल लोक परमेश्वराच्या दृष्टीनें वाईट तें करूं लागले; त्यांनीं परमेश्वराच्या दृष्टीनें वाईट तें केलें म्हणून परमेश्वरानें मवाबाचा राजा एग्लोन ह्याचें इस्त्राएलावर वर्चस्व स्थापलेंय १३ तेव्हां त्यांनें अम्मोना व अमालेकी ह्यांना आपल्याबरोबर घेऊन इस्त्राएलावर चाल केली आणि त्यांना पराभूत करून खजुरींचे नगर हस्तगत केलें. १४ म्हणून इस्त्राएल लोकांनीं मवाबाचा राजा एग्लोन ह्याचें अठरा वर्षे दास्य केलें. १५ मग इस्त्राएल लोकांनीं परमेश्वराचा धांवा केला, तेव्हां परमेश्वरानें गेराचा मुलगा एहूद ह्याला त्यांना सोडविणारा म्हणून उभे केलें; तो बन्यामिनी असून डावरा होता; त्याच्या हस्तें इस्त्राएल लोकांनीं मवाबाचा राजा एग्लोन ह्याला नजराणा पाठविला. १६ एहूदनें हातभर लांब दुधारी तरवार आपल्यासाठी बनवून आपल्या कपड्याखालीं उजव्या बाजूला लटकावली १७ त्याबें मवाबाचा राजा एग्लोन ह्याच्यापुढें नजराणा सादर केला; एग्लोन हा फार लठ्ठ होता. १८ नजराणा दिल्यानंतर त्यानें नजराणा घेऊन आलेल्या लोकांची रवानगी केली; १९ पण गिलगालाजवळील पाषाणमूर्तीपर्यंत गेल्यावर एहूद स्वतः परत येऊन म्हणाला, महाराज, मला आपल्याला काहीं गुप्त गोष्ट सांगायची आहे. राजा म्हणाला, गप राहा, तेव्हां त्याच्याजवळ उभे असलेले सगळे लोक बाहेर गेले. २० एहूद त्याच्यापाशी आला त्या समयीं तो हवेशीर माडीवर एकटा बसला होता. एहूद त्याला म्हणाला, मी आपणासाठीं देवाचा संदेश आणला आहे तेव्हां तो आसनावरून उठला. २१ मग एहूदानें आपल्या डाव्या हातानें उजव्या मांडीवरलीं तरवार उपसून त्याच्या पोटात खुपसली; २२ पात्यांबरोबर मूठहि आंत गेली, आणि चरबींत रूतून बसली. त्यानें त्यांच्या पोटांतून तरवार काढली नाहीं; ती पार्श्वभागीं निघाली होती. २३ मग बाहेर देवडीवर जाऊन एहूदानें माडीचे दरवाजे लावून कुलूप लावलें. २४ तो निघून गेल्यावर हुजरे येऊन पाहतात तों माडीचे दरवाजे बंद असल्याचें त्यांच्या दृष्टीस पडलें. तेव्हां त्यांना वाटलें कीं, तो आपल्या हवेशीर खोलीच्या संडासांत गेला असेल. २५ ते वाट पाहून पाहून थकले; तो माडीचे दरवाजे उघडीत नाही असें पाहून त्यांनीं किल्ली घेऊन ते उघडले आणि पाहतात तों त्यांचा स्वामी मरून भूमीवर पडला होता. २६ ते वाट पाहत होते तेवढ्या अवकाशांत एहूद पळून पाषाणमूर्तीच्या पलीकडे सईरा येथें जाऊन पोहंचला. २७ तेथें गेल्यावर त्यानें एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशांत रणशिंग फुंकले, तेव्हा त्याच्याबरोबर इस्त्राएल लोक डोंगराळ प्रदेशांतून उतरले, आणि तो त्यांच्यापूढें चालला. २८ तो त्यांना म्हणाला, माझ्या पाठोपाठ या, कारण परमेश्वरानें तुमचे मवाबी शत्रु तुमच्या हाती दिले आहेत. तेव्हां त्यांनी त्याच्या पाठोपाठ जाऊन मवाब देशाजवळचे यार्देनेचे उतार रोखून धरले आणि कोणालाहि पार जाऊं दिलें नाहीं. २९ त्या समयी त्यांनी मवाब्यांचे सुमारें दहा हजार लोक मारले; ते सर्व धिप्पाड व शूर वीर होते; त्यांच्यांतला कोणीहि बचावला नाही. ३० अशा प्रकारें मवाब त्या दिवशीं इस्त्राएलाच्या काबूंत आला. ह्यानंतर देशाला ऐशीं वर्षे स्वास्थ लाभलें. पलिष्ट्यांच्या हातांतून शमगार इस्त्राएल लोकांस सोडवतो ३१ एहूदनंतर अनाथाचा मुलगा शमगार हा पुढें आला; त्यानें सहाशे पलिष्ट्याना बैलाच्या पराणीनें जिवें मारलें; अशा प्रकारें त्यानेंहि इस्त्राएलाची सुटका केली.