३२
१ “रस्त्यातल्या मुलीकडे अभिलाषेने न बघण्याचा करार मी माझ्या डोळ्यांशी केला आहे. २ तो सर्वशाक्तिमान देव लोकांना काय करतो? तो त्याच्या स्वर्गातील घरातून लोकांची परतफेड कशी करतो? ३ देव दुष्टासाठी संकटे आणि विनाश पाठवतो. आणि जे चुका करतात त्यांच्यासाठी अरिष्टे पाठवतो. ४ मी जे काही करतो ते देवाला दिसते. माझी प्रत्येक हालचाल तो बघतो. ५ “मी खोटे बोललो नाही व लोकांना फसविण्याचा प्रयत्न केलेला नाही. ६ जर देव योग्य तागडी वापरेल तर त्याला समजेल की मी निरपराध आहे. ७ मी जर योग्य मार्गापासून दूर गेलो असेन आणि माझ्या डोळ्यांनी जर माझ्या मनाला वाईटाकडे वळवले असेल किंवा माझे हात पापांनी बरबटलेले असतील. ८ तर इतरांना मी पेरलेले धान्य खाऊ दे. आणि माझे पीक उपटून घेऊ दे. ९ “माझ्या मनात स्त्रियांबद्दल लंपट भावना उत्पन्न झाली असेल किंवा शेजाऱ्याच्या बायकोबरोबर व्यभिचार करण्यासाठी त्याच्या घराचे दार उघडण्याची मी वाट पहात असेन. १० तर माझ्या बायकोला दुसऱ्याचे अन्न शिजवू दे आणि दुसऱ्यांना तिची शय्यासोबत करु दे. ११ का? कारण लैंगिक पाप लज्जास्पद आहे. या पापाला शिक्षा झालीच पाहिजे. १२ लैंगिक पाप माझ्या सर्वस्वाचा नाश करील. सर्वस्वाचा होम करणारी ती आग आहे. १३ “माझे गुलाम माझ्या विरुध्द तक्रार करतात तेव्हा मी न्यायाने वागण्याचे मान्य केले नाही, १४ तर मी जेव्हा देवासमोर जाईन तेव्हा मी काय करु? देवाने माझ्या वागण्याचा जाब विचारला तर मी काय उत्तर देऊ? १५ देवाने मला माझ्या आईच्या शरीरात निर्माण केले आणि त्यानेच माझ्या गुलामांनाही घडवले. देवाने आपल्या सर्वांचीच आईच्या पोटात निर्मिती केली आहे. १६ “मी गरीबांना मदत करणे कधीच अमान्य केले नाही. मी विधवांना नेहमीच त्यांना ज्याची गरज असते ते दिले. १७ मी माझ्या अन्नाविषयी कधीच स्वार्थी नव्हतो. मी पोरक्यांना नेहमी अन्न दिले आहे. १८ मी जन्मभर पोरक्यांचा बाप बनलो. मी विधवांची काळजी वाहिली. १९ जेव्हा जेव्हा मला कपडे नाहीत म्हणून दु:खी होणारे लोक दिसले किंवा कोट नसलेले गरीब लोक दिसले. २० त्यांना मी नेहमी कपडे दिले. मी माझ्या मेंढ्यांची लोकर त्यांना उबदार ठेवण्यासाठी वापरली आणि त्यांनी अंत:करणापासून मला आशीर्वाद दिले. २१ माझ्या दाराजवळ एखादा पोरका मुलगा मदतीसाठी आलेला मला दिसला तर मी त्याच्यावर कधीही हात उगारला नाही. २२ मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्यांपासून निखळून पडो मी जर कधी असे केले तर माझा हात माझ्या खांद्याच्या सांध्यातून तुटून पडो.