३९
१ “ईयोब, पहाडी बकऱ्या कधी व्यायतात ते तुला माहीत आहे का? हरिणी आपल्याबछड्याला जन्म देताना तू पाहिले आहेस का? २ ईयोब पहाडी बकरी आणि हरिणी किती महिने आपल्या पिलांना पोटात वाढवतात ते तुला माहीत आहे का? त्यांची जन्माला यायची वेळ कोणती ते तुला माहीत आहे का? ३ ते प्राणी लोळतात प्रसूतिवेदना सहन करतात आणि त्यांची पिल्ले जन्माला येतात. ४ ती बछडी शेतात मोठी होतात. नंतर ती आपल्या आईला सोडून जातात आणि पुन्हा कधीही परतून येत नाहीत. ५ ईयोब, रानटी गाढवांना कोणी सोडून दिले? त्यांची दोरी सोडून त्यांना कोणी मोकळे केले? ६ मी (देव) रानटी गाढवांना वाळवंटात घर दिले. मी त्यांना राहण्यासाठी क्षारभूमी दिली. ७ रानटी गाढवे गजबजलेल्या शहरांना हसतात (त्यांना शहरातला गजबजाट आवडत नाही) आणि त्यांना कुठलाही माणूस आव घालू शकत नाही. ८ रानगाढवे डोंगरात राहतात. तेच त्यांचे कुरण आहे. ते आपले अन्न तिथेच शोधतात. ९ “ईयोब, गवा (रानटी बैल) तुझी सेवा करायला तयार होईल का? तो रात्री तुझ्या खळ्यावर राहील का? १० ईयोब, गवा तुला त्याच्या गळ्यात दोरी बांधू देईल का? आणि तू त्याला तुझे शेत नांगरायला लावू शकशील का? ११ गवा खूप बलवान असतो, परंतु तो तुझे काम करील असा विश्वास तुला वाटतो का? १२ तो तुझे धान्य शेतातून गोळा करेल आणि खळ्यात नेईल असा भरवसा तुला वाटतो का? १३ “शहामृगी आपले पंख आनंदाने फडफडवते. परंतु तिला उडता येत नाही. तिचे पंख आणि पिसे करकोचाच्या पंखासारखी नाहीत. १४ शहामृगी आपली अंडी जमिनीत घालते आणि ती वाळूत उबदार होतात. १५ आपल्या अंड्यांवरुन कुणी चालत जाईल किंवा रानटी प्राणी ती फोडतील हे ती विसरते. १६ शहामृगी आपल्या पिलांना सोडून जाते. ती जणू स्वत:ची नाहीतच असे ती वागते. तिची पिल्ले मेली तरी तिला त्याची पर्वा नसते. काम निष्कळ झाल्याचे सुखदु:ख तिला नसते. १७ का? कारण मी (देव) शहामृगीला शहाणे केले नाही. शहामृगी मूर्ख असते. मीच तिला तसे केले आहे. १८ परंतु शहामृगी जेव्हा पळण्यासाठी उठते तेव्हा ती घोड्याला आणि घोडेस्वाराला हसते, कारण ती कुठल्याही घोड्यापेक्षा जोरात पळू शकते. १९ “ईयोब, तू घोड्याला त्याची शक्ती दिलीस का? तू त्याच्या मानेवर त्याची आयाळ ठेवलीस का? २० ईयोब, तू घोड्याला टोळाप्रमाणे लांब उडी मारायला सांगितलेस का? घोडा जोरात फुरफुरतोआणि लोक त्याला घाबरतात. २१ घोडा बलवान आहे म्हणून आनंदात असतो. तो आपल्या खुराने जमीन उकरतो आणि धावत युध्दभूमीवर जातो. २२ घोडा भीतीला हसतो, तो कशालाही भीत नाही. तो युध्दातून कधीही पळ काढीत नाही. २३ सैनिकाचा भाता घोड्याच्या बाजूला हलत असतो. त्याचा स्वार जे भाले आणि इतर शस्त्रे बाळगतो ते उन्हात चमकतात. २४ घोडा फार अनावर होतो. तो जमिनीवरजोरात धावतो. तो जेव्हा रणशिंग फुकलेले ऐकतो तेव्हा तो एका जागी स्थिर राहू शकत नाही. २५ रणशिंग ऐकू येते तेव्हा घोडा घाई करतो. त्याला दुरुनही लढाईचा वास येतो. सेनापतींनी दिलेल्या आज्ञा आणि युध्दातले इतर अनेक आवाज त्याला ऐकू येतात. २६ “ईयोब, तू ससण्याला पंख पसरुन दक्षिणेकडेउडायला शिकवलेस का? २७ ईयोब, गरुडाला आकाशात उंच उडायला शिकवणारा तूच का? तूच त्याला त्याचे घरटे उंच पहाडावर बांधायला सांगितलेस का? २८ गरुड उंच सुळक्यावर राहातो. तीच त्याची तटबंदी आहे २९ गरुड त्याच्या तटबंदीवरुन आपले भक्ष्य शोधतो. गरुडाला एवढ्या उंचीवरुन आपले भक्ष्य दिसू शकते. ३० गरुड प्रेताभोवती गोळा होतात आणि त्यांची पिल्ले रक्त पितात.”