१ “कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याने गुरांढोरापैकी दोष नसलेला नर किंवा मादी यांचा करावा. २ त्याने त्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपाच्या दारापाशी त्याचा वध करावा; मग अहरोनाचे मुलगे जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व सभोवती शिंपडावे. ३ शांत्यार्पण हे अग्नीद्वारे केलेले अर्पण होय. याजकाने पशूच्या आंतड्यावरील चरबी व त्यांस लागून असलेली सर्व चरबी अर्पण करावी. ४ दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी आणि काळजाच्या पडद्यावरील चरबी हे सर्व अर्पावे। ५ ह्या सर्वांचा अहरोनाच्या मुलांनी वेदीवरील विस्तवावर रचलेल्या लाकडावरील होमार्पणावर त्याचा होम करावा; हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे. त्याच्या सुवासाने परमेश्वराला आनंद होतो. ६ “परमेश्वराकरिता कोणाला शांत्यर्पणसाठी शेरडांमेढरांचे अर्पण आणावयाचे असेल तर ते दोष नसलेल्या नराचे किंवा मादीचे असावे. ७ जर त्याला कोकरु अर्पण करावयाचे असेल तर त्याने ते परमेश्वरासमोर आणावे. ८ त्याने त्या पशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर तो वधावा आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीसभोंवती शिंपडावे. ९ अर्पण करणाऱ्यांने शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वराला हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी द्यावा. त्याने त्या पशूची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढलेले चरबीदार शेपूट, आंतड्यावरील भोवतालची चरबी. १० दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळील चरबी व गुरद्यापर्यंतचा चरबीचा पडदा हे सर्व अर्पावे. ११ मग याजकाने त्या सर्वाचा वेदीवर होम करावा; हे शांत्यर्पण अग्नीद्वारे परमेश्वराला केलेले अर्पण आहे, परंतु हे लोकांसाठी अन्नसुद्धा होईल. १२ “कोणाला जर बकऱ्याचे अर्पण करावयाचे असेल तर त्याने तो बकरा परमेश्वरासमोर आणावा. १३ त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर त्याचा वध करावा; मग अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर व सभोंवती शिंपडावे. १४ त्याने त्या शांत्यर्पणाचा काही भाग परमेश्वरासाठी होम करण्याकरिता द्यावा; तसेच त्याने त्याच्या बलीच्या आंतड्यावरील व त्यास लागून असलेली चरबी. १५ दोन्ही गुरदे, त्यांवरील कमरेजवळची चरबी आणि गुरद्यापर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा हे सर्व अर्पावे. १६ मग याजकाने वेदीवर त्या सर्वाचा होम करावा ह्या सुवासिक शांत्यार्पणाने परमेश्वराला आनंद होतो; हे अग्नीद्वारे केलेले अर्पण आहे. हे लोकांसाठी अन्न होईल. परंतु त्यातील उत्तम भाग म्हणजे चरबी परमेश्वराची आहे. १७ तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये; तुम्ही जेथे कोठे राहाल तेथे तुमच्यासाठी हा नियम पिढ्यान्पिढ्या कायमचा चालू राहील.”