१९
जक्कय
१ येशूने यरीहोत प्रवेश केला आणि त्यामधून जात होता. २ तेव्हा पाहा, जक्कय नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो मुख्य जकातदार असून खूप श्रीमंत होता.
३ येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. ४ तेव्हा तो सर्वांच्या पुढे पळत गेला आणि येशूला पाहण्यासाठी एका उंबराच्या झाडावर चढला कारण तो त्याच रस्त्याने पुढे जाणार होता. ५ मग येशू त्याठिकाणी येताच दृष्टी वर करून त्यास म्हणाला, “जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.” ६ तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत-स्वागत केले. ७ हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की, “पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे.” ८ तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे धन गरिबांस देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असले तर ते चौपट परत करतो.” ९ येशू त्यास म्हणाला, “आज या घराचे तारण झाले आहे कारण हा मनुष्यसुद्धा अब्राहामाचा मुलगा आहे. १० कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधण्यास आणि तारण्यास आला आहे.”
मोहरांचा दृष्टांत
११ ते या गोष्टी ऐकत असता त्याने त्यास एक दाखलाही सांगितला कारण तो यरुशलेम शहराजवळ होता आणि देवाचे राज्य आताच प्रकट होणार आहे असे त्यांना वाटत होते. १२ तो म्हणाला, “कोणीएक उमराव, आपण राज्य मिळवून परत यावे या उद्देशाने दूरदेशी गेला. १३ त्याने आपल्या दहा दासांना बोलावले व त्यांना दहा नाणी देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत त्यावर व्यापार करा.’ १४ त्याच्या नगरचे लोक त्याचा व्देष करत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ‘ह्याने आमच्यावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही.’ १५ मग असे झाले कि, तो राज्य मिळवून पुन्हा परत आल्यावर ज्यांना त्याने व्यापाराकरिता पैसा दिला होता, त्यावर किती नफा झाला हे समजावे म्हणून दासांना आज्ञा देऊन त्यांना बोलावीले. १६ पहिला पुढे आला आणि म्हणाला, ‘धनी तुम्ही दिलेल्या नाण्यावर मी आणखी दहा नाणी मिळवली आहेत.’ १७ तेव्हा तो त्यास म्हणाला, ‘चांगल्या दासा, छान केलेस, तू थोडक्यांविषयी विश्वासू झालास, म्हणून तू दहा नगरांवर अधिकारी होशील.’ १८ मग दुसरा आला व म्हणाला, ‘धनी, तुमच्या पाच नाण्यांवर मी पाच नाणी आणखी मिळवली.’ १९ आणि तो त्यास म्हणाला, ‘तू पाच नगरांवर अधिकारी असशील.’ २० मग आणखी एक दास आला आणि म्हणाला, ‘धनी, आपण दिलेले नाणे मी हातरुमालात बांधून ठेवले होते. २१ आपण कठोर आहात, जे आपण ठेवले नाही, ते आपण काढता आणि जे पेरले नाही, ते कापता. म्हणून मला तुमची भीती वाटत होती,’ २२ धनी त्यास म्हणाला, ‘दुष्ट दासा, तुझ्याच शब्दांनी मी तुझा न्याय करतो. तुला ठाऊक होते की मी कडक शिस्तीचा मनुष्य आहे. मी जे दिले नाही ते घेतो आणि जे पेरले नाही त्याची कापणी करतो, २३ तर तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? मग जेव्हा मी परत आलो असतो तेव्हा ते मला व्याजासह मिळाले असते.’ २४ त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांना तो म्हणाला, ‘त्याच्यापासून ते नाणे घ्या आणि ज्याच्याजवळ दहा नाणी आहेत, त्यास द्या.’ २५ ते त्यास म्हणाले, ‘धनी, त्याच्याजवळ दहा नाणी आहेत.’ २६ धन्याने उत्तर दिले, ‘मी तुम्हास सांगतो, ज्याच्याजवळ आहे, त्यास अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडे जे काही असेल तेसुध्दा काढून घेतले जाईल. २७ परंतु मी राज्य करू नये अशी इच्छा करणाऱ्यांचा माझ्या शत्रूंना येथे आणा आणि माझ्यासमोर ठार मारा.’ ”
येशूचा यरुशलेम शहरात जयोत्सवाने प्रवेश
२८ येशूने या गोष्टी सांगितल्यावर तो वर यरुशलेम शहरापर्यंत गेला. २९ तो वर जातांना, जेव्हा तो जैतून डोंगर म्हटलेल्या टेकडीनजीक असलेल्या बेथफगे आणि बेथानीजवळ आला तेव्हा त्याने आपल्या दोन शिष्यांना असे सांगून पाठवले, ३० व म्हटले, “तुमच्यासमोर असलेल्या खेड्यात जा. तुम्ही प्रवेश करताच, ज्यावर कोणी बसले नाही असे शिंगरु तुम्हास बांधलेले आढळेल. ते सोडून येथे आणा. ३१ जर तुम्हास कोणी विचारले की, ‘तुम्ही ते का सोडता? तर म्हणा की, प्रभूला याची गरज आहे.’ ” ३२ ज्यांना पाठवले होते, ते गेले आणि त्याने सांगितल्याप्रमाणे त्यास आढळले. ३३ ते शिंगरु सोडीत असता त्याचा मालक त्यांना म्हणाला, “तुम्ही शिंगरु का सोडता?” ३४ ते म्हणाले, “प्रभूला याची गरज आहे.” ३५ त्यांनी ते येशूकडे आणले. त्यांनी आपले झगे शिंगरावर घातले आणि येशूला त्याच्यावर बसविले. ३६ येशू रस्त्यावरुन जात असता लोक आपली वस्त्रे रस्त्यावर पसरीत होते. ३७ तो जेव्हा जैतून डोंगराच्या उतरावर आला तेव्हा सर्व शिष्यसमुदाय, त्यांनी जे चमत्कार पाहिले होते त्याबद्दल मोठ्या आनंदाने देवाची स्तुती करू लागला.
३८ ते म्हणाले, “प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो! स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव.” ३९ जमावातील काही परूशी येशूला म्हणाले, “गुरुजी, आपल्या शिष्यांना गप्प राहण्यास सांगा.” ४० त्याने उत्तर दिले, “मी तुम्हास सांगतो, जर ते शांत बसतील तर हे धोंडे ओरडतील.”
यरुशलेम शहराकडे पाहून येशूने केलेला विलाप
४१ तो जेव्हा जवळ आला व त्याने शहर पाहिले, तेव्हा तो त्यासाठी रडला आणि म्हणाला, ४२ “कोणत्या गोष्टी तुला शांती देतील ते जर आज तू जाणून घेतले असते तर! परंतु आता त्या तुझ्या नजरेपासून लपवून ठेवण्यात आल्या आहेत. ४३ तुझ्यावर असे दिवस येतील की, तुझे शत्रू तुझ्याभोवती कोट उभारतील. तुला वेढतील आणि सर्व बाजूंनी तुला कोंडीत पकडतील. ४४ ते तुला, तुझ्या मुलांना तुझ्या भिंतीच्या आत धुळीस मिळवतील व दगडावर दगड राहू देणार नाही कारण तू देवाचा तुझ्याकडे येण्याचा समय तू ओळखला नाही.”
येशू परमेश्वराच्या भवनाचे शुद्धिकरण करतो
४५ येशूने परमेश्वराच्या भवनात प्रवेश केला व विक्री करीत होते त्यांना बाहेर घालवू लागला. ४६ आणि त्यांना म्हणाला, असे लिहिले आहे की, “माझे घर प्रार्थनेचे घर होईल, पण तुम्ही ते लुटारुची गुहा केली आहे.”
४७ तो दररोज परमेश्वराच्या भवनात शिकवीत असे. मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक, लोकांचे पुढारी त्यास ठार मारण्याचा प्रयत्न करीत होते. ४८ पण तसे करण्यासाठी त्यांना काही मार्ग सापडत नव्हता कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत.