३१
१ ही लमुएल राजाची नीतिसूत्रे आहेत त्याच्या आईने त्याला या गोष्टी शिकवल्या. २ तू माझा मुलगा आहेस. मी प्रेम करत असलेला मुलगा. ज्यासाठी मी प्रार्थना केली होती तोच मुलगा तू आहेस. ३ तुझी शक्ती स्त्रियांवर खर्च करु नकोस. स्त्रियामुळेच राजांचा नाश होतो त्यांच्यापायी स्वत:चा नाश करु नकोस. ४ लमुएला, द्राक्षारस पिणे हे राजांच्या दृष्टीने शहाणपणाचे नसते. मद्याची इच्छा धरणे हे राज्यकर्त्यांच्या दृष्टीने शहाणपणाचे नसते. ५ ते कदाचित् खूप पितील आणि कायदा काय म्हणतो ते विसरुन जातील. नंतर ते गरीबांचे सर्व हक्क काढून घेतील. ६ गरीब लोकांना मद्य द्या. जे लोक संकटात आहेत त्यांना द्राक्षारस द्या. ७ ते नंतर पितील आणि ते गरीब आहेत हे विसरुन जातील. ते पितील आणि त्यांची सर्व संकटे विसरतील. ८ जर एखादा माणूस स्वत:ला मदत करु शकत नसेल तर तुम्ही त्याला मदत करा. जे लोक संकटात आहेत त्या सर्वांना तुम्ही मदत केली पाहिजे. ९ ज्या गोष्टी योग्य आहेत हे तुम्हाला माहीत आहे त्या गोष्टीसाठी लढा आणि सर्वांना योग्य रीतीने न्याय द्या. गरीबांच्या आणि ज्या लोकांना तुमची गरज आहे अशा लोकांच्या न्यायाचे रक्षण करा. १० सर्वगुणसंपन्न स्त्री शोधणे खूप कठीण आहे. पण तिचे मोल जड-जवाहिऱ्यापेक्षा अधिक आहे. ११ तिचा नवरा तिच्यावर अवलंबून असतो. तो कधीही गरीब होणार नाही. १२ ती तिच्या आयुष्यभर नवऱ्याचे कल्याण करते. ती त्याच्यावर कधीही संकटे आणीत नाही. १३ ती नेहमी लोकर आणि कापड तयार करण्यात मग्न असते. १४ ती दूरच्या प्रदेशातील मेंढीसारखी असते. ती सर्व ठिकाणाहून घरी अन्न आणते. १५ ती भल्या पहाटे उठते तिच्या कुटुंबासाठी अन्न शिजवते आणि नोकर मुलींना काय करायचे ते सांगते. १६ ती जमिनी बघते आणि विकत घेते. तिने साठवलेल्या पैशांचा उपयोग करुन ती द्राक्षाचे मळे लावते. १७ ती खूप काम करते. ती खूप शक्तिवान आहे. आणि सर्व काम करण्यात तरबेज आहे. १८ तिने केलेल्या गोष्टी जेव्हा ती विकते तेव्हा तिला नेहमी नफा होतो. आणि ती रात्री उशीरापर्यंत काम करते. १९ ती स्वत:चे सूत स्वत: कातते आणि स्वत:चे कपडे विणते. २० ती नेहमी गरीबांना देते आणि ज्यांना गराज असते अशांना मदत करते. २१ जेव्हा बर्फ पडतो (म्हणजेच फार थंडी असते) तेव्हा ती आपल्या कुटुंबाची काळजी करत नाही. तिने त्या सर्वाना चांगले, गरम कपडे दिलेले असतात. २२ ती अंथरुणावर टाकायला चादरी आणि पांघरायला पांघरुणे तयार करते. चांगल्या कापडापासून केलेले कपडे ती वापरते. २३ लोक तिच्या नवऱ्याचा आदर करतात. तो देशाचा एक नेता असतो. २४ ती खूप चांगली उद्योगी - स्त्री असते. ती कपडे आणि पट्टे तयार करते आणि ती त्या वस्तू त्या व्यापाऱ्यांना विकते. २५ ती खूप ताकतवान आहे आणि लोक तिला मान देतात ती भविष्याबद्दल विश्वास आहे. २६ ती शहाणपणाचे बोल बोलते. ती लोकांना प्रेमळ व दयाळू असावे असे शिकविते. २७ ती कधीही आळशी नसते. ती तिच्या घरातील गोष्टींची काळजी घेते. २८ तिची मुले तिच्याबद्दल चांगले बोलतात. तिचा नवरा तिच्याबद्दल अभिमान बाळगतो आणि म्हणतो, २९ “चांगल्या स्त्रिया खूप आहेत. पण तू सर्वांत चांगली आहेस.” ३० मोहकता आणि सौंदर्य तुम्हाला फसवू शकेल. पण जी स्त्री परमेश्वराचा आदर करते तिची प्रशांसा केली पाहिजे. ३१ तिला साजेसे बक्षीस तिला द्या. लोकांमध्ये तिची प्रशंसा करा. तिने ज्या गोष्टी केल्या आहेत त्याबद्दल तिची स्तुती करा.