६४
१ देवा, माझे ऐक, माझ्या शत्रूंनी मला घाबरविले आहे. त्यांच्यापासून मला वाचव. २ माझे माझ्या शत्रूंच्या गुप्त योजनांपासून रक्षण कर. त्या दुष्ट लोकांपासून मला लपव. ३ त्यांनी माझ्याबद्दल अगदी वाईट खोटं सांगितलं आहे. त्यांच्या जिभा धारदार तलवारी सारख्या आहेत. त्यांचे कटू शब्द बाणाप्रमाणे आहेत. ४ ते लपून बसतात आणि त्यांचे बाण एका साध्याभोळ्या आणि प्रामाणिक माणसावर फेकतात. ५ वाईट करण्यासाठी ते एकमेकांना प्रोत्साहन देतात व सापळे रचण्याबाबत चर्चा करतात. “आपले सापळे कोणीही बघणार नाही” असे ते एकमेकांना सांगतात. ६ लोक अतिशय कुटिल असू शकतात. लोक काय विचार करतात ते कळणे अवघड आहे. ७ परंतु देवदेखील त्याचे “बाण” मारु शकतो आणि त्यांना काही कळण्या आधीच वाईट लोक जखमी होतात. ८ वाईट लोक इतर लोकांना त्रासदायक गोष्टी करण्याच्या योजना आखतात. परंतु देव त्यांच्या योजना निष्फळ बनवतो आणि त्या त्रासदायक गोष्टी त्यांच्याच वाट्याला येतील असे करतो. आणि नंतर जो कोणी त्यांना पाहातो तो मस्तक विस्मयाने हलवतो. ९ देवाने काय केले ते लोक पाहातील. ते इतरांना देवाबद्दल सांगतील, त्यामुळे सगळ्यांना देवाबद्दल अधिक काही कळेल आणि त्याला आदर देण्याचे ही त्यांना कळेल. १० परमेश्वराची सेवा करण्यास चांगल्या व्याक्तिला आनंद वाटतो. तो देवावर विसंबून राहातो. चांगल्या प्रामाणिक लोकांनी हे पाहिल्यावर ते देवावर विश्वास ठेवतात.