१२८
१ परमेश्वराचे सर्व भक्त सुखी आहेत. ते देवाच्या इच्छे प्रमाणे जगतात. २ तू ज्या गोष्टींसाठी काम करतोस त्या गोष्टींचा तू उपभोग घेशील, तू आनंदी राहाशील आणि तुझ्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतील. ३ घरी तुझी बायको सुफलीत द्राक्षवेलीसारखी असेल. मेजाभोवती तुझी मुले तू लावलेल्या जैतूनाच्या झाडांसारखी असतील. ४ परमेश्वर अशा रीतीने त्याच्या भक्तांना आशीर्वाद देईल. ५ परमेश्वर तुला सियोनवरुन आशीर्वाद देवो. परमेश्वराच्या आशीर्वादाचा तू यरुशलेममध्ये जन्मभर आनंद उपभोगावा अशी आशा करतो. ६ आणि तू तुझी नातवंडे पाही पर्यंत जगशील अशी मी आशा करतो. इस्राएलमध्ये शांती नांदू दे.