देवाच्या कोकऱ्याचा साक्षात्कार
१ मग मी, ‘जो राजासनावर बसला होता’ त्याच्या उजव्या हातात मी एक गुंडाळी पाहिली. गुंडाळीवर दोन्ही बाजूंनी लिहिले होते आणि ती गुंडाळी सात शिक्के ‘मारून बंद केली होती.’ २ आणि मी एक सामर्थ्यशाली देवदूत पाहिला. तो देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला, “गुंडाळीचे शिक्के तोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे?” ३ परंतु स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यांत पाहावयास समर्थ नव्हता. ४ ती गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास योग्य असा कोणी आढळला नाही म्हणून मला फार रडू आले. ५ परंतु वडीलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! पहा, ‘यहूदा’ वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर हा विजयी झाला आहे. तो गुंडाळी उघडण्यास व तिचे सात शिक्के उघडण्यास समर्थ आहे.”
६ राजासनाच्या आणि चार जिवंत प्राण्यांच्या व त्या वडीलांच्या मध्यभागी ‘कोकरा’ उभा असलेला मी पाहिला, तो वधलेल्यासारखा होता, त्यास सात शिंगे आणि सात डोळे होते आणि हे ते सर्व पृथ्वीवर पाठविण्यात आलेले देवाचे सात आत्मे होते. ७ तो गेला आणि त्याने जो, ‘राजासनावर बसला होता’, त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली.
८ आणि जेव्हा त्याने ती गुंडाळी घेतली तेव्हा चार जिवंत प्राणी व चोवीस वडीलजन कोकऱ्यासमोर उपडे पडले, प्रत्येकाजवळ वीणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक ‘धूपाने’ भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या, त्या वाट्या म्हणजे पवित्रजनांच्या ‘प्रार्थना’ होत्या.
९ आणि त्यांनी ‘नवे गाणे गाईलेः’
“तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास योग्य आहेस,
कारण तुला वधण्यात आले आणि तू आपल्या रक्ताने खंडणी भरून
प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आणि राष्ट्रांतून ‘देवासाठी’ माणसे विकत घेतली आहेत.
१० तू त्यांना आमच्या देवासाठी एक ‘राज्य’ आणि ‘याजक’ बनविले
आणि नंतर ते पृथ्वीवर राज्य करतील.”
११ मग मी पाहिले राजासन आणि, चार जिवंत प्राणी व वडीलजन यांच्यासभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली, त्यांची संख्या ‘अयुतांची अयुते व हजारो हजार होती.’ १२ देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले,
जो वधलेला कोकरा,
सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान,
गौरव व उपकारस्तुती ही घेण्यास योग्य आहे.
१३ प्रत्येक निर्माण केलेली वस्तु आकाशात व पृथ्वीवर, पृथ्वीखाली व समुद्रातील अवघ्याना मी असे गाताना ऐकले की, “जो राजासनावर बसतो त्यास व कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य युगानुयुगापर्यंत असो!” १४ चार जिवंत प्राणी म्हणाले, “आमेन!” मग वडीलजनांनी खाली पडून त्यास अभिवादन केले.