सात कर्ण्याचा नाद
१ जेव्हा कोकऱ्याने सातवा शिक्का उघडला, तेव्हा सुमारे अर्ध्या तासापर्यंत स्वर्गात शांतता होती. २ नंतर देवासमोर सात देवदूत उभे राहिलेले मी पाहिले आणि त्यांना सात कर्णे देण्यात आले.
३ दुसरा एक देवदूत येऊन, ‘वेदीपुढे उभा राहिला.’ त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते; राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्रजनांच्या ‘प्रार्थनांसह धुप’ ठेवण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ ‘धूप’ दिला होता. ४ देवदूताच्या हातातून ‘धूपाचा’ धूर पवित्रजनांच्या ‘प्रार्थनांसह’ देवासमोर वर चढला. ५ तेव्हा देवदूताने ‘धुपाटणे’ घेऊन त्यामध्ये ‘वेदीवरचा अग्नी भरून’ पृथ्वीवर टाकला आणि ‘मेघांचा गडगडाट व गर्जना’ झाल्या, ‘विजा’ चमकल्या व भूमिकंप झाला. ६ ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते ते आपआपले कर्णे वाजवण्यास तयार झाले.
७ पहिल्या देवदूताने कर्णा वाजवताच ‘रक्तमिश्रित गारा व अग्नी ही आली. ती पृथ्वीवर’ टाकण्यात आली यासाठी की, पृथ्वीचा तिसरा भाग व झाडांचा तिसरा भाग जळून गेला; आणि सर्व हिरवे गवत जळून गेले. ८ दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला आणि तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले आणि समुद्राच्या तिसऱ्या भागाचे रक्त झाले. ९ समुद्रातील तिसरा भाग जिवंत प्राणी मरण पावले आणि तसेच तिसरा भाग जहाजांचा नाश झाला. १० तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा ‘तारा आकाशातून खाली पडला.’ तो नद्यांच्या व झऱ्यांच्या तिसऱ्या भाग पाण्यावर पडला; ११ त्या ताऱ्याचे नाव कडूदवणा आणि पाण्याच्या तिसऱ्या भागाचा कडूदवणा झाला; आणि त्या पाण्याने मनुष्यांपैकी पुष्कळ माणसे मरण पावली; कारण ते पाणी कडू झाले होते.
१२ चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा सूर्याचा तिसरा भाग, चंद्राचा तिसरा भाग व ताऱ्यांचा तिसरा हिस्सा मारला गेला; त्यांचा तिसरा भाग अंधकारमय झाला आणि दिवसाचा व रात्रीचाही तिसरा भाग प्रकाशित झाला नाही.
१३ आणि मी पाहिले, तेव्हा एक गरूड आकाशाच्या मध्यभागी उडत होता; आणि मी त्यास मोठ्याने असे म्हणताना ऐकले की, जे तीन देवदूत कर्णे वाजवणार आहेत त्यांच्या कर्ण्याच्या होणाऱ्या आवाजाने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार‍!